पोलिसांचा कुठलाही उत्सव वैयक्तिक नसतो
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा.प्रत्येक घरी बाप्पा विराजमान होतो.मात्र सर्वांसाठीच हा उत्साह सारखा नसतो.गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीसांना सतत गस्तीवर राहावे लागते. त्यामुळे माझ्यासोबतच बंदोबस्तात असणार्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रत्येक पोलीसाचा गणेशोत्सव हा अनोखाच असतो.लोकांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी तत्पर असणे हाच आमचा गणेशोत्सव.पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्याकडून सांजवार्ता प्रतिनिधीने ’त्यांच्या गणेसोत्सवाविषयी ’ जाणून घेतले.
गेली 25 -26 वर्षे पोलीस खात्यात असल्यामुळे परदेशी यांना कौटुंबिक गणेशोत्सवासाठी जास्त वेळ देणे शक्य होत नाही.पुढे त्या म्हणाल्या, ’ आमच्या घरी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. माझ्या दोन जुळ्या मुली, 1 मुलगा, पती सर्व मिळून गणेशोत्सवातील घरच्या सर्व जबाबदार्या सांभाळून घेतात.त्यामुळे मी निश्चिंतपणे माझे काम करू शकते.सकाळी ड्यूटीसाठी घरातून निघतांना बाप्पाची सकाळची आरती मी करते. मात्र सायंकाळी घरी जाण्यास उशीर होतो. त्यामुळे संध्याकाळी आरतीसाठी वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी बंदोबस्तासाठी म्हणून आम्ही जातो त्याठिकाणीच असणार्या विविध गणेश मंडळांकडून आम्हाला आरतीसाठी बोलावले जाते.
कुटुंबासोबत घालवलेला गणेशोत्सव कायम आठवणीत
साधारणतः 3 वर्षांपूर्वी माझी पोस्टिंग औरंगाबाद महानगरपालिकेत होती. त्यावेळीच्या गणेशोत्सवात गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत मी दररोज गणपतीला वेळ देऊ शकले. ही माझ्यासाठी एक सर्वोत्तम आठवण आहे.जी मी कधीही विसरु शकत नाही. कारण गेली 26 वर्षे मी पोलीस खात्यात आहे.कधीही कुठेही पोहोचावे लागते त्यामुळे वैयक्तिकरित्या कुटुंबासोबत कुठलेही सण - उत्सव आम्हाला साजरे करता येत नाही.त्यावेळी मुख्य बंदोबस्तात नसल्याने कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करता आला. त्यानंतर अशी संधी मिळालीच नाही. त्यामुळे तो गणेशोत्सव कायम मनाच्या एका कोपर्यात सुंदर आठवणींसारखा आहे.